(पिंपरी, दि. ३) : “आजचा व्यसनमुक्त तरुण हेच उद्याच्या देशाचे भवितव्य आहे. तरुणाईला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी व्यापक जनजागृती आणि सामाजिक सहभागाची गरज आहे,” असे प्रतिपादन न्यायविद लीगल अँड सोशल जस्टिस फाउंडेशनचे विश्वस्त ॲड. संकेत राव यांनी केले.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त सामाजिक न्याय आणि अधिकारता मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, होप मानसिक पुनर्वसन व व्यसनमुक्ती केंद्र, भोसरी आणि न्यायविद लीगल अँड सोशल जस्टिस फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे व्यसनमुक्त भारत जागरुकता अभियान सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ॲड. संकेत राव बोलत होते.

ज्येष्ठ विधिज्ञ तथा न्यायविद लीगल अँड सोशल जस्टिस फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. सतीश गोरडे यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन झाले. यावेळी होप व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ. विजय मोरे, केंद्र समन्वयिका प्रा. सुनीता मोरे, उपाध्यक्ष ॲड. सचिन शिंदे आणि ॲड. महेश सोनवणे उपस्थित होते.

ॲड. राव म्हणाले की, अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रसारामुळे तरुणाईसमोर गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. व्यसनमुक्तीसाठी तरुणांचे मनपरिवर्तन आणि सातत्यपूर्ण जनजागृती आवश्यक आहे. होप व्यसनमुक्ती केंद्र गेल्या २७ वर्षांपासून व्यसनमुक्तीसाठी कार्यरत असून, २०२७ पर्यंत देशातील तरुणाईला व्यसनमुक्त करण्यासाठी नागरिकांनी सामूहिक संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. विजय मोरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. चंद्रकांत फुगे, योगेश कुडपणे, विकास गायकवाड, संदेश तावरे, सुभाष जाधव आणि रामानू सोमाणी यांनी संयोजनासाठी सहकार्य केले. प्रा. सुनीता मोरे यांनी आभार मानले.